
मुरगूड, वार्ताहर :
सध्यस्थितीत नवीन एच.आय.व्ही. संसर्गगितांची आकडेवारी जरी आटोक्यात येत असली तरी प्रत्येकाने सजग राहून एच.आय.व्ही ला दूर ठेवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आय.सी.टी.सी. ग्रामीण रुग्णालय मुरगुड चे समुपदेशक राजेश गोधडे यांनी केले.सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड येथे ‘इंटेंसिफाईड आय.ई.सी. कार्यक्रमात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे अध्यक्षस्थानी होते. तर प्रा.डॉ. ए. डी. जोशी, प्रा. दिगंबर गोरे, प्रा. स्वप्नील मेंडके प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना राजेश गोधडे म्हणाले की, एच.आय.व्ही.च्या बाबतीत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. एच.आय.व्ही. संबंधित अजूनही काही समज गैरसमज आहेत,ते समजावून घेतले पाहिजेत.ठराविक कारणांमुळे एच.आय.व्ही.चा संसर्ग होत असून एच.आय.व्ही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्याने हा संसर्ग होत नाही.एच.आय.व्ही एड्स च्या सखोल माहितीसाठी व तपासणीसाठी सरकारी दवाखान्यातील आयसीटीसी केंद्रात भेट देणे गरजेचे आहे.अथवा १०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा. एड्स नियंत्रण कायदा २०१७ नुसार कोणत्याही एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तीस वाईट वागणूक दिल्यास अथवा भेदभाव केल्यास दोषींवर कडक कारवाई अथवा शिक्षा होऊ शकते. युवकांनी सखोल माहिती घेऊन एड्स नियंत्रण करण्यासाठी हातभार लावणे आवश्यक असून युवा वर्गाने जनजागृती केल्यास शास्त्रशुद्ध माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यास सहकार्य होईल.
प्राचार्य डॉ शिवाजीराव होडगे म्हणाले, युवक हा देशाचा कणा असून एन.एस.एस. च्या माध्यमातून तयार झालेला तरुण सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. एड्स नियंत्रणामध्ये सुद्धा हे स्वयंसेवक अग्रेसर राहून जनजागृती करतील.
यावेळी प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







