अध्यक्ष के. पी. पाटील यांची ६८ व्या वार्षिक सभेत घोषणा
सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बिद्री, ता. कागल (२७ सप्टेंबर) :
लहरी हवामान, रोगप्रदूर्भाव व बदलत्या हवामानाचा ऊस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, ‘बिद्री’ साखर कारखान्याने या वर्षी ऊस गाळप वाढवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस वेळेत आणि अधिक प्रमाणात गाळपासाठी, २० कि.मी. अंतरापर्यंत ऊस वाहतूकदारांना प्रतिटन ५७ रुपये अतिरिक्त मोबदला दिला जाणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.
साखर कारखान्याची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सर्व आठ ठराव सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले. यावेळी कोल्हापूर सर्किट बेंचच्या मंजुरीबद्दल अभिनंदनाचा ठराव आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ऊस पिकांच्या पंचनाम्यांसाठी आर्थिक मदतीचा ठराव मंजूर करण्यात आला.
१० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट – गत वर्षीपेक्षा १०० नवीन टोळींच करार
अध्यक्ष पाटील म्हणाले, “गेल्या वर्षी सुमारे ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप कमी झाले. त्यामुळे सहवीज प्रकल्प, इथेनॉल व मोलॅसिस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. यंदा १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, गेल्या हंगामापेक्षा अधिक १०० नवीन ऊस टोळी करार करण्यात आले आहेत.”
त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “आपण पिकवलेला संपूर्ण ऊस बिद्री कारखान्याकडेच गाळपासाठी पाठवा, जेणेकरून उच्चांकी गाळप, आर्थिक स्थैर्य व सर्व उत्पादक विभागांचे उद्दिष्ट साध्य होईल.”

ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर – शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बिद्री कारखान्याच्या संचालक मंडळाने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे. यासाठी शेतकऱ्यांसाठी हेक्टरमागे २५,००० रुपये खर्च अपेक्षित असून, त्यात:
- व्हीएसआय संस्थेकडून ₹९,२५०
- कारखान्याकडून ₹६,७५०
- शेतकऱ्यांचा वाटा ₹९,०००
- जिल्हा बँकेकडून ६% व्याजदराने कर्ज उपलब्ध
अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, “या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस उत्पादनात निश्चित वाढ होणार आहे.“
ड्रोनद्वारे औषध फवारणी – ड्रोन फवारणीचा खर्च कारखाना करणार
गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही लोकरी मावा, तांबेरा व पांढरी माशी यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव ऊसावर जाणवू लागला आहे. यावर उपाय म्हणून यंदा ११०० एकर क्षेत्रावर ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली.
शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येऊ नये म्हणून, ड्रोन फवारणीचा संपूर्ण खर्च बिद्री कारखाना उचलणार असल्याची घोषणा अध्यक्ष पाटील यांनी केली. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले.

उपस्थित मान्यवर आणि यशस्वी आयोजन
सभेस जिल्हा बँक संचालक रणजितसिंह पाटील, शामराव देसाई, विलास कांबळे, माजी संचालक सुरेश सुर्यवंशी, पांडूतात्या पाटील, रमेश वारके, दिनकर कोतेकर, भिकाजी एकल, दत्ता पाटील, भरत पाटील, रघूनाथ चव्हाण, गारगोटी सरपंच प्रकाश वास्कर यांच्यासह उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक – प्रविणसिंह पाटीस, सुनिलराज सुर्यवंशी, धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, पंडीतराव केणे, उमेश भोईटे, मधूकर देसाई, के. ना. पाटील, सत्यजित जाधव, राहूल देसाई, राजेंद्र मोरे, डी. एस. पाटील, रंगराव पाटील, दीपक किल्लेदार, रविंद्र पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र भाटले, रणजित मुडुकशिवाले, फिरोजखान पाटील, रामचंद्र कांबळे, सौ. क्रांती उर्फ अरुंधती संदिप पाटील, सौ. रंजना आप्पासो पाटील, रावसाहेब खिलारी, स्विकृत संचालक -फत्तेसिंग भोसले-पाटील, जीवन पाटील, शासन नियुक्त संचालक – भुषण पाटील, कामगार प्रतिनिधी- शिवाजी केसरकर, राजेंद्र पाटील व्यवस्थापकीय संचालक – आर. डी. देसाई, बिद्री ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती, सेवा संस्था, दुध संस्था यांचे पदाधिकारी तसेच मोठया संखेने सभासद उपस्थित होते ,स्वागत व विषय पत्रिकेचे वाचन के. एस. चौगले यांनी केले. आभार उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी मानले.
📌 विशेष वैशिष्ट्ये
सभासदांच्या हितासाठी तांत्रिक, आर्थिक व धोरणात्मक निर्णय
यंदा ऊस वाहतूक व गाळपासाठी विशेष अनुदान योजना
एआय व ड्रोन तंत्रज्ञानाने ऊस उत्पादनात भरघोस वाढीची शक्यता
शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्याचा कारखान्याचा प्रयत्न






