
कोल्हापूर,
मानवाने उपभोगाचे प्रमाण कमी केल्यास पर्यावरणाचे संतुलन होण्यास मदत होईल,असे मत पुणे येथील पर्यावरण प्रश्नांचे अभ्यासक जेष्ठ पत्रकार अनुप जयपूरकर यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लि. कोल्हापूर आणि लक्ष्मी मल्टीपर्पज फाउंडेशन,गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण भान आणि पत्रकारिता’ या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे जनरल मॅनेजर हरीश सायवे, किर्लोस्कर ऑइल इंजिन्सचे सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर,लक्ष्मी मल्टीपर्पज फौंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई,पर्यावरण अभ्यासक संदीप चोडणकर आणि अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव उपस्थित होते.
जयपुरकर म्हणाले, विकास आणि प्रगतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. जंगलतोड,शहरीकरण आदी मुळे आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे.अलीकडेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेती योग्य माती वाहून गेली असून या परिसरात नजीकच्या काळात पुरेशी शेती पिकू शकणार नाही. या प्रश्नांची तीव्रता कमी करायची असेल तर माणसांनी सवयी बदलून निसर्ग पूरक सवयींचा अंगीकार केला पाहिजे.
दुसऱ्या सत्रात पाणी प्रश्नाचे अभ्यासक संदीप चोडणकर म्हणाले,मानवाच्या अस्तित्वासाठी नदी आणि पाण्याची शुद्धता आवश्यक आहे.
कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे म्हणाले, देशातील जंगलेच प्रदूषणामुळे धोक्यात असून त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.जंगल प्रदूषण सुद्धा रोखले पाहिजे.
किर्लोस्कचे एच.आर.मॅनेजर हरीश सायवे म्हणाले, किर्लोस्कर समुहाच्या वतीने नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबाविले जातात. पर्यावरण रक्षणासाठी किर्लोस्कर सामाजिक उपक्रम नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत.
प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सानिका पाटील यांनी केला. सूत्रसंचालन समृद्धी मोदक हिने तर आभार जिजा जाधव हिने मानले.






