
चंदगड दि. २३:
बऱ्याचदा महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. खाण्यापिण्याकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने शारीरिक व मानसिक तक्रारींचा सामना करावा लागतो.हे घडू नये म्हणून प्रत्येक महिलेने स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत सजग असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय चंदगडचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. जोहेब मकानदार यांनी केले. १७ सप्टेंबर ते २ऑक्टोबर अखेर चालणाऱ्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.वैद्यकीय अधिकारी डॉ.गजेंद्र पाटील, डॉ. प्रज्ञा सरतापे व डॉ.सुनील हासुरे प्रमुख उपस्थित होते.
डॉ मकानदार पुढे म्हणाले की, स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे. घरातील स्त्री सशक्त असेल तर संपूर्ण परिवार सशक्त राहण्यास मदत होते. याकरिता स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःसह कुटुंबालाही सशक्त ठेवावे. यासाठीच हे अभियान राबाविले जात आहे.
या अभियानांतर्गत रक्तदाब, मधुमेह,नेत्र तपासणी,दंत तपासणी,स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी, हिमोग्लोबिन,क्षयरोग तपासणी याबरोबरच तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन सुद्धा केले जाणार आहे.
यावेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ.कदम,जनरल फिजिशियन डॉ.अभिजीत चौधरी, डॉ. स्नेहल हासुरे,डॉ. योगेश पवार, डॉ.पल्लवी निंबाळकर,डॉ. देवदत्त सुतार,डॉ.प्राचीका धारकर, डॉ. इंद्रजीत पानारी,प्रदीप कांबळे, अधिपरिचारक चंद्रकांत देसाई,अश्विनी केदार,सुप्रिया कांबळे, अश्विनी पाटील,वर्धमान दिगंबरे, राजेंद्र सांगावकर इत्यादी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक आरबीएसके वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल मुसळे यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार समुपदेशक विनायक देसाई यांनी केले.






