
कोल्हापूर : दि. ११,
महाराष्ट्राबरोबर जिल्ह्यातील राजकारणात अनेक धक्कादायक बातम्या ऐकायला मिळत आहेत. सर्वजण निष्ठा गुंडाळून स्वतःचे भले होण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. याला अलीकडच्या काळापर्यंत अपवाद होते ते दिवंगत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार संपतबापू पवार- पाटील. स्व. पी. एन. पाटील मरेपर्यंत काँग्रेसचा झेंडा घेऊन जगले व जिल्ह्याला एकनिष्ठतेचा संदेश दिला. तर दुसरीकडे माजी आमदार संपतबापू पवार- पाटील शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा घेऊन कष्टकरी जनतेचा आवाज बनून राहिले. स्व. आमदार पी. एन. पाटील व मा.आ.संपतबापू पवार -पाटील आयुषभर एकमेकांविरोधात लढले. कोणाला स्वप्नातही वाटत नव्हते की हे दोघे एकत्र येतील. पण भोगावती कारखान्याच्या सतेसाठी ते एकत्र आले.
स्व. पी. एन. पाटील यांची निष्ठा गुंडाळून ठेवून त्यांचे पुत्र राहुल व राजेश यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. आणि ना. अजित पवार व ना. हसन मुश्रीफ यांचे नेतृत्व स्विकारले.
दुसरीकडे येणारी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवून संपतबापू पवार -पाटील यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार यांनी घड्याळ हातात बांधायचा निर्णय घेतलेला आहे. काल करवीर तालुक्यातील जि. प. साठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखतीसाठी संपतबापुंचे चिरंजीव क्रांतिसिंह पवार -पाटील, भोगावती संचालक अक्षय पवार पाटील, केरबा पाटील, माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे माजी उपसभापती अमित कांबळे इत्यादी कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार पक्ष्याच्या मुलाखतीला उपस्थित होते.
एकंदरीत करवीर तालुक्यातून शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार हे अधोरेखित झालेले असून हा निर्णय राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांना किती पचनी पडतोय हे येणारा काळच ठरवेल.
स्व.आ. पी. एन. पाटील यांच्या वारसदारांनी करवीमधून हाताचा पंजा गायब करण्यासाठी पाऊले उचलली आहेत.राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून करवीर मध्ये अस्तित्व नसलेल्या घड्याळाला करवीर मध्ये उभारी दिलेली आहे. पण माजी मंत्री आ. सतेज पाटील हे करवीर मध्ये हाताचा पंजा बळकट करण्यासाठी धडपडत आहेत.
शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा मात्र काही अंशी गायब होणार हे ठळक होऊ लागलेले आहे.





