
राजकारणातील मित्र आणि नाटकातील पात्र खरे नसतात याची प्रचिती अलीकडच्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही. नुकताच कागलकारांनी एक धक्का दिलेला आहे.
सख्खे मित्र असलेली जोडी गेल्या 10-15 वर्षांपूर्वी पक्के वैरी झाल्याची घटना जिल्ह्यातील जनतेला सर्वश्रुत आहे. या मित्रांच्या भांडणात अनेक मित्र व कार्यकर्ते भरडून निघालेले आहेत. जिल्ह्याचा विकास सुद्धा काही अंशी खुंटलेला आहे. ही जोडी म्हणजे राजकारणातील जय बीरू होते. मुन्ना बंटी….
राज्याच्या विधानपरिषदेतील गटनेते आ. सतेज पाटील व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे सख्खे मित्र. सध्या दोघेही वेगळ्या पक्षात आहेत. या दोन मित्रांना एकत्र आणण्यासाठी भाजपच्या एका मोठया नेत्याने कंबर कसलेली आहे. कारण हे दोघे एकत्र आले की बरीच वळवळ थांबणार आहे. यासाठी येणाऱ्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा मुहूर्त सापडण्याची शक्यता आहे.याला कारणेही तशीच आहेत. जिल्ह्यातील उदयाला येणारे नवीन नेतृत्व रोखायचे आहे. आ.अमल महाडिक व खा. धनंजय महाडिक यांच्यातील दरी रुंदावताना दिसत आहे. त्यामुळे खा. महाडिक यांनाही सुरक्षित व्हायचे आहे. आ. सतेज पाटील हे एकटे पडलेले आहेत त्यांनाही सुरक्षित व्हायचे आहे.कारण ते राज्याचे नेतृत्व करणार आहेत. शिवाय कोल्हापूरचा विकास हे दोघांचेही व्हिजन आहे. राज्यातील बड्या नेत्यांनाही आपला हेतू साध्य करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बंटी -मुन्ना यांचे जे जिवलग मित्र आहेत ते कॉमन आहेत. त्यांनाही दोघांना एकत्र करायचे आहे. या सर्व घडामोडीत दादा या नात्याने ‘त्या’ नेत्यांनी पुढाकार घेतलेला असून तशा बैठकाही झाल्याचे समजते.या दोघांमध्ये ना. हसन मुश्रीफ व आ. राजेश क्षीरसागर असल्याचेही बोलले जाते.
आ. सतेज पाटील व खा. धनंजय महाडिक एकत्र येतात की नाही हे लवकरच कळेल.






