
गारगोटी : दि. १३
मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा नसून मानवाने सत्कर्म करुन जीवन सार्थकी लावावे असे विवेचन ह. भ. प. संभाजी चव्हाण महाराज, गर्जनकर यांनी केले. पाल ता. भुदरगड येथे आयोजित १२५ व्या हरीनाम साप्ताहामध्ये आयोजित प्रवचन सेवेप्रसंगी ते बोलत होते.
ह. भ. प. संभाजी चव्हाण महाराज पुढे म्हणाले, संतांनी फार मोठी शिकवण आपल्याला दिलेली आहे. हरीनाम सप्ताह हा आत्मशांती साठी घातलेला पाया असून परमार्थाने आत्मिक समाधान लाभते.जन्माला येऊन वाईट मार्गाला लागून वाईट कर्म केल्यास मिळणारी शिक्षा इथेच भोगावी लागते. ईश्वराला समर्पण होऊन मनोभावे सेवा करणे हाच परमार्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
पाल येथे गेल्या १९०२ साली पहिल्यांदा हरीनाम साप्ताहाला सुरुवात झाली असून हे १२५ वर्ष असल्यामुळे गावात भक्तिमय वातावरण असून पंचक्रोशीतील भाविक भेट देत आहेत. ८ दिवस संपुर्ण गावात चूल बंद असून सकाळ संद्याकाळी भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत.





