
विशेष मुलांच्या पालन पोषणात मुख्यतः आई पालक स्वतःचे शिक्षण ,छंद विसरून पूर्णवेळ आपल्या मुलात गुंतून राहते. अशा वेळेस तिला नोकरी करणेही अशक्य बनते. आपल्यानंतर आपल्या मुलाच्या भवितव्याची चिंता बहुतेक पालकांना सतावत असते. मुलाला स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे असते. अमन फाउंडेशनच्या स्वमग्न मुलांच्या आई पालकांनी कृती प्रकल्पाद्वारे मुलाला सोबत घेऊनच आर्थिकदृष्ट्या उभे राहण्याची खटपट चालू केली. याचाच एक भाग म्हणून आरव माने या स्वमग्न मुलाच्या आईने नुकतेच राजारामपुरी परिसरात नाष्टा सेंटर सुरू केले आहे. आज या सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अमन फाउंडेशनचे मार्गदर्शक सुरेश शिपुरकर यांचे हस्ते करण्यात आले.
आपल्या स्वमग्न मुलाचे पालन पोषण करत आरवच्या आई, कविता माने यांनी धाडसाने टाकलेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे असे उद्गार यावेळी सुरेश शिपुरकर यांनी काढले. याप्रसंगी संस्थेचे हितचिंतक लक्ष्मी सिव्हिल इंजीनियरिंग चे राजेंद्र दोशी तसेच दिलीप ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती.
वेद मुळे, ईशान हलके, आरोही खाबडे, प्रज्ञेश पेंढारकर, कबीर खान, अमन पेडणेकर ही विशेष मुले आपल्या पालकांसह उपस्थित होती. साथी हाथ बढाना या गाण्याप्रमाणे इतर पालकांच्या सहकार्याने कविता माने यांनी व्यवसायास सुरुवात केली आहे.
स्वमग्न मुलांना सांभाळताना पालकांची होणारी दमछाक, अशा वेळेस समाजाने अशा मुलांना सामावून घेण्यासाठी हात देण्याची गरज आपल्या मनोगतात पालक दीपा शिपुरकर यांनी व्यक्त केली.
मनीष पवार, राहुल राज शेखर,अमृता भारती,सुरेश देशपांडे, अल्लाउद्दीन बागवान ,संजय गायकवाड, क्रांतिसिंह चव्हाण, मकरंद चौधरी ,सरिता सवदी तसेच अनेक हितचिंतक यावेळी हजर होते.





