
राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत गेली २० ते २२ वर्षे झाले कंत्राटी तत्ववार कर्मचारी काम करत आहेत. आरोग्य विभागातील कायम स्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणेच हे कर्मचारी काम करत असतात. पगारात मात्र फार मोठी तफावत असून शासनाच्या इत्तर कोणत्याही सुविधा या कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत.
राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कर्मचाऱ्यांच्या खुप वर्षे आधीपासून एड्स नियंत्रण कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सुद्धा कायम सेवेत घेण्यासाठी हालचाली गेल्या वर्षभरापासून चालू आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यासाठी प्रस्ताव बनवून कॅबिनेट मंजुरीसाठी आला होता. पण अचानक विधानसभा आचारसंहिता लागल्याने हा निर्णय थांबलेला होता.
गेल्या काही महिन्यांपासून एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या सेवासमायोजन बाबत हालचाली गतिमान झालेल्या असून, शासनाकडून या कर्मचाऱ्यांची वारंवार माहिती मागविली जात आहे. आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या भेटीदरम्यान आपले समायोजन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी समायोजन शासन निर्णयातील त्रुटी दूर करुन त्यांचे काम मार्गी लागत आहे व एड्स नियंत्रण कर्मचारी हे कित्येक वर्षे काम करत असल्याची जाणीव असून त्यांचाही शासन निर्णय लवकरच घेत असल्याचे सांगितले असल्याचे समजते. त्या दृष्टीने आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या, मुंबई येथील कार्यालयात भेट देऊन राज्याच्या एड्स नियंत्रण कामासोबत कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत माहिती घेतलेली आहे.
मंत्रालयीन स्तरावरील हालचाली पहाता एड्स नियंत्रण कर्मचारी कायम सेवेत समाविष्ट होणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.






