नेसरी :
कोलेकर महाविद्यालयांमध्ये ‘युवा दिनानिमित्त’ व्याख्यान
हल्लीच्या काळामध्ये मोबाईलवर ऑनलाइन सहज उपलब्ध होणारी माहिती व मोबाईलचा अतिवापर यामुळे तरुण वयामध्येच नको असणाऱ्या गोष्टी घडू शकतात तरुणांनी वाढत्या वयाबरोबर कुठे थांबायचे व कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे याबाबत सजग असले पाहिजे असे मत ग्रामीण रुग्णालय नैसर्गिक चे समुपदेशक कपिल मुळे यांनी मांडले ‘रेड रिबन क्लब,राष्ट्रीय सेवा योजना व विध्यार्थी विकास कक्ष’ भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी यांच्या वतीने युवा दिनानिमित्त ‘आजचा युवक व एचआयव्ही/एड्स या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एन. एस. एस. प्रमुख प्रा. डॉ. कुंभार होते.
पुढे बोलताना कपिल मुळे म्हणाले की, हल्लीच्या इंटरनेट युगामुळे मोबाईलवर कोणत्याही गोष्टीची सहज माहिती मिळत असल्याने युवक त्या माहितीच्या आधारे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात.पण ती माहिती अचूक आहे की नाही याचा अंदाज बांधता येत नाही. अपुऱ्या माहितीच्या आधारे या वयात पाऊले नको तिकडे वळतात.आणि या ठिकाणीच धोका निर्माण होऊन एचआयव्ही सारख्या संसर्गाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. एकदा एचआयव्हीचा संसर्ग झाला की तो बरा होऊ शकत नाही.एड्स जनजागृती साठीच ‘रेड रिबन क्लब ची’ स्थापना प्रत्येक महाविद्यालयामध्ये करण्यात आलेली आहे.या क्लबच्या स्वयंसेवकाकडून एचआयव्ही/ एड्स,गुप्तरोग, क्षयरोग इत्यादी बाबतीत अचूक माहिती प्रत्येकाने घ्यावी व निरोगी आयुष्य जगण्यासाठी वाटचाल करावी.
प्रा.डॉ.माधव माधव भोसले यांनी प्रास्ताविकामध्ये रेड रिबन क्लब व युवा दिनाची संकल्पना सांगितली.आभार प्रा.डॉ. कांबळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





