
चंदगड : दि. १८,
किडनीची कार्यक्षमता कमी झाल्यावर रुग्णाला डायलिसिस हा पर्याय उपलब्ध असून त्याद्वारे किडनीची कार्यक्षमता वाढविली जाते. ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे डायलिसिस सेवेला नुकताच प्रारंभ झालेला असून याचा लाभ तालुक्यातील रुग्णांना होणार आहे.
एखाद्या रुग्णाला डायलिसिस उपचार चालू केल्यास त्याला वारंवार उपचारासाठी जावे लागते. ही सेवा गडहिंग्लज येथे उपलब्ध असल्याने तालुक्यातील रुग्णांना त्या ठिकाणी जावे लागत होते. नातेवाईक व रुग्णांचा वेळ पैसा खर्च होत होता.शिवाय प्रवासाचा त्रासही जाणवत होता.चंदगड ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सेवा सुरू झाली असून राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात उद्घाटन झालेले होते. चंदगड मध्ये ही सेवा सुरू झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
एच. एल.एल. या खासगी कंपनीकडे हा विभाग चालविण्यासाठी दिलेला असून कंपनीमार्फत तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या गडिंग्लज मध्ये चंदगड तालुक्यातील अंदाजे ३० रुग्ण डायलिसिस सेवा घेत असून हे रुग्ण ६ सायकल पूर्ण झाल्यानंतर चंदगड येथे उपचार घेणार आहेत.डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत असून,चंदगड ग्रामीण रुग्णालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गतही उपचार व छोट्या शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रश्मी माळगावकर यांनी सांगितले.






