
कोल्हापूर :
इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागलेला आहे.या परीक्षेमध्ये कोल्हापूर येथील समर्थ विद्या मंदिर, उचगाव चा विध्यार्थी केतक पल्लवी निरंजन देशपांडे याने शारीरिक मर्यादांवर मात करत 64 टक्के गुण मिळवत यश मिळविलेले आहे.
केतक यास मस्कुलर डिस्ट्रॉफी या दुर्मिळ जनुकीय आजारामुळे अपंगत्व आले असून, यामध्ये शरीराच्या स्नायूंची कमजोरी वाढत जाते. इतरांचे अपंगत्व हे नेहमी एकसारखेच राहत असते पण मस्क्युलर डिस्ट्रॉफी हे अपंगत्व दिवसेंदिवस वाढत राहून स्नायू पूर्णपणे कमजोर होत जातात. हालचाल करणे सुद्धा अवघड बनत जाते.
केतक आजच्या परिस्थितीमध्ये परावलंबी असून, त्याची सर्व सुश्रुषा आई-वडील करत असतात. विशेष म्हणजे तो 2021 पासून शाळेत गेलेला नाही. घरी अभ्यास करून रायटर च्या साह्याने त्याने दहावीची परीक्षा देऊन हे यश मिळविलेले आहे. त्याला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचा घ्यावयाचा आहे पण मर्यादांमुळे त्याला ते शक्य नाही.
कोणत्याही क्लासविना तो उत्तम हार्मोनियम वाजवत असून त्याला संगीत विशारद होण्याची इच्छा आहे.
आई पल्लवी व वडील निरंजन हे त्याची विशेष काळजी घेत असतात. दोघेही नोकरी सांभाळून त्याचे पालन पोषण करत आहेत. स्वतः अभ्यास करून यश मिळविणाऱ्या केतकने सर्व सोयी असून सुद्धा अभ्यास न करणाऱ्या मुलांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलेले आहे.






