
चंदगड, दि. २४ :
चंदगड ग्रामीण रुग्णालयाचे काम चांगल्या पद्धतीने चाललेले असून आरोग्याच्या योजना व सेवा तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे आवाहन चंदगड पंचायत समितीचे सभापती विलास नाईक यांनी केले. ग्रामीण रुग्णालय चंदगड, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम यांच्या वतीने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.रश्मी माळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड ग्रामीण रुग्णालयात विध्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. गट शिक्षण अधिकारी वैभव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी., मकानदार, सहाय्यक अधीक्षक विक्रम कळेकर, केंद्र प्रमुख भादवणकर प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना विलास नाईक म्हणाले की, राष्ट्रीय बालस्वाथ्य कार्यक्रमातून शालेय विध्यार्थ्यांना विविध सेवा पुरविल्या जात असून या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवावी. व तालुक्यातील आरोग्याला प्राधान्य द्यावे.
गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील म्हणाले, चंदगड तालुका हा शिक्षणाच्या दृष्टीने सजग तालुका आहे. सर्व सेवा विध्यार्थ्यांना पुरविण्याचा प्रयत्न असतो. आरोग्याच्या बाबतीत मुले सदृढ राहण्याकरिता पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. मोबाईलचा अतिवापर टाळून मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवायला हवे.
बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल पाटील यांनी प्रस्ताविकात बालस्वास्थ्य कार्यक्रमाचा आढावा दिला.
यावेळी तालुक्यातील २०० विध्यार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले.
सुत्रसंचालन समुपदेशक विनायक देसाई यांनी केले. तर आभार बालस्वास्थ्य नोडल अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी मानले.
यावेळी बालस्वास्थ्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी निंबाळकर,औषध निर्माता कृष्णदत्त परीट,रुचिता बांदेकर,छाया पुजारी,चंद्रकांत देसाई,शैलजा भालभर हे उपस्थित होते.





