
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीमध्ये राजकीय समन्वय आणि मैत्रीधर्माचा अनोखा नमुना पाहायला मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील संभाव्य लढत टळत अखेर दोन्ही पदांची बिनविरोध निवड झाली.या प्रक्रियेत काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या गटाने महत्त्वाची भूमिका बजावत मैत्रीधर्म जपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून रसिका पाटील तर उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून विनंती झाल्यास बिनविरोध निवड व्हावी यासाठी अर्ज मागे घेण्याची तयारी काँग्रेसने आधीच दर्शवली होती. त्यानुसार राष्ट्रवादीच्या विनंतीनंतर दोन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी, तर भाजपचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली आणि त्यांनी अधिकृत घोषणा केली.या निर्णयामागे राजकीय समन्वयाचे सूत्र महत्त्वाचे ठरले. महाविकास आघाडीच्या वतीने सुरुवातीला निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता. मात्र संग्रामसिंह कुपेकर यांनी सभागृहातील पाच वर्षांच्या सहकार्याचा विचार करून सर्वांनी एकत्र येत विकासाच्या दृष्टीने काम करावे, अशी विनंती केली. त्याला प्रतिसाद देत काँग्रेसने माघार घेतली.विशेष म्हणजे सतेज पाटील आणि महाडिक गटातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपाध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.तानाजी पाटील यांच्या निवडीबाबत काय भूमिका घेतली जाईल,याबाबत उत्सुकता होती. मात्र आगामी पाच वर्षांत सर्व सदस्यांना समान वागणूक आणि विकासनिधीमध्ये भेदभाव होणार नाही, या अटीवर ही निवड बिनविरोध करण्यात आली.या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत स्थैर्य निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून,राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचा सकारात्मक संदेशही यातून दिला गेला आहे. शिवाय गोकुळ निवडणुकीत हा दोस्ताना टिकविणार असल्याचा संदेश सुद्धा दिलेला असावा.






