
चंदगड तालुका हा जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर असणारा तालुका आहे. या तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सेवा देण्यासाठी कटीबद्ध असून ग्रामीण रुग्णालय चंदगडमध्ये सुविधा वाढविण्यावर भर दिला जाईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय चंदगडच्या डागडुजीसाठी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेल्या १ कोटी ९० लाख रुपयांच्या कामाचे व डायलेसिस विभागाच्या उदघाटन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील,नगराध्यक्ष सुनील काणेकर,आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने,प्रांतधिकारी एकनाथ काळबांडे,जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, तहसीलदार राजेश चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रश्मी माळगावकर प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. आबिटकर म्हणाले, चंदगड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यावर भर दिला जाणार असून चंदगड च्या जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी विशेष लक्ष दिले जाईल. ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे डायलेसिस सेवा उपलब्ध होत आहे त्याचा फायदा रुग्णांना होणार असून रुग्णांचा त्रास वाचणार आहे.
आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, चंदगड हा दुर्गम तालुका आहे. या तालुक्यात सेवा सुविधा वाढविण्याची गरज आहे. ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी झालेली आहे. कर्मचारी निवास्थाने खराब असून ती नव्याने बांधण्याची व चंदगड तालुक्यातील मुलींसाठी नर्सिंग कॉलेज चालू करण्याची मागणी त्यांनी केली.
या वेळी तालुका आरोग्य अधिकारी बी. डी. सोमजाळ,डॉ.गजेंद्र पाटील,डॉ. जोहेब मकानदार, डॉ. सुनील हासूरे यांच्यासह अधिकारी,कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
आभार आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मानले. सुत्रसंचालन समुपदेशक विनायक देसाई यांनी केले.






